बडबडगीते
बालगीते
balgite, Songs for kids
असं हे बालपण!
बोलक पसरून खुदुखुदु हसायचं,
भोकाड पसरून धो-धो रडायचं !
घर-भर फिरायचं, हव ते मागायचं,
कोणालाच नाही जुमानायचं,
असं हे बालपण ! असं हे बालपण !
गोड गोड गोजिरवाणी !
देवाजीच सुंदर लेण !
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
आपडी थापडी
आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू !
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर
ए आई मला पावसात जाउ दे
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवियत्री : वंदना विटणकर
गाडी आली गाडी आली
गाडी आली गाडी आली – झुक् झुक् झुक्
शिट्टी कशी वाजे बघा – कुक् कुक् कुक्
इंजिनाचा धूर निघे – भक् भक् भक्
चाके पाहू तपासून – ठक् ठक् ठक्
जायचे का दूर कोठे – भूर् भूर् भूर्
कोठेहि जा नेऊ तेथे – दूर् दूर् दूर्
तिकिटाचे पैसे काढा – छ्न् छ्न् छ्न्
गाडीची ही घंट वाजे – घण् घण् घण्
गाडीमधे बसा चला – पट् पट् पट्
सामानाहि ठेवा सारे – चट् चट् चट्
नका बघू डोकावून – शुक् शुक् शुक्
गाडी आता निघालीच – झुक् झुक् झुक्
गोरी गोरीपान फुलासारखी
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…
गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…
चांदोबा चांदोबा भागलास का ?
चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न् शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळकर
फुलपाखरु छान किती दिसते
फुलपाखरू
छान किती दिसते
फुलपाखरू ।।धृ।।
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते
फुलपाखरू ।।१।।
पंख विमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते
फुलपाखरू ।।२।।
डोळे
बारिक करिती लुकलुक
गोल मणी जणु ते
फुलपाखरू ।।३।।
मी धरू जाता येइ न हाता
दूरच ते उडतें
फुलपाखरू ।।४।।
पप्पा सांगा कुणाचे
पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।
इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन् भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।
आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।
पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।
शाळा सुटली, पाटी फुटली
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
कवी : योगेश्वर अभ्यंकर
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
#भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?
@भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
कवी : मंगेश पाडगावकर
tags-
सांग सांग भोलानाथ,शाळा सुटली, पाटी फुटली,पप्पा सांगा कुणाचे,फुलपाखरु छान किती दिसते,नाच रे मोरा, अंब्याच्या बनात,झुक झुक झुक झुक अगीनगाडी,चांदोबा चांदोबा भागलास का ?,असं हे बालपण!,ए आई मला पावसात जाउ दे,गाडी आली गाडी आली
2 thoughts