बदली प्रक्रिया कार्यपद्धती व त्यातील टप्पे
३. शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे :-
३.१ बदलीस पात्र शिक्षक यांचेकडून जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी मागविण्यात यावा. (सोबतच्या विवरणपत्रानुसार).
३.२ बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी देणे आवश्यक राहील. (सोबतच्या विवरणपत्रानुसार)
३.२.१ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा.
३.२.२ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास, किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास, त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.
३.३ बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.

बदली प्रक्रिया कार्यपध्दती :
येथे क्लिक करा
४.१ टप्पा क्र.१ :-
ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल.
उदा.:- एखादया शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.
४.१.१ ज्या शाळेत तीन बदली पात्र शिक्षक आहेत. अशा वेळी तेथील दोन बदलीपात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.
४.१.२. शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.
४.२ टप्पा क्र.२ :-
विशेष संवर्ग शिक्षक भाग – १ यांच्या बदल्या :
४.२.१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
४.२.२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
४.२.३. विशेष संवर्गातर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमत: बदली अनुज्ञेय राहील.
४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल.
या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.
४.२.७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.२.८. विशेषसंवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.
४.३. टप्पा क्र.३ :-
विशेष संवर्ग शिक्षक भाग – २ यांच्या बदल्या :
४.३.१. टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग – २ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.
४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे
संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन . जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.
४.३.५.३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील.
४.३.६. विशेष संवर्ग २ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
४.४ टप्पा क्र.४:-
बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :
४.४. टप्पा क्र.४- बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :
४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र – १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
४.४.३. सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.
४.४.४. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
४.४.५. बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
४.४.६. बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.
४.५ टप्पा क्र. ५ :-
बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :
४.५.१. टप्पा क्र.१,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. ४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.
४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.
४.५.४. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
४.६ टप्पा क्र. ६ :-
विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा :
टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

One thought