Skill education
‘स्कील एज्युकेशन’ कधी?
विचार करायला लावतं ते शिक्षण, जाणीवा समृद्ध करतं ते शिक्षण. जगायला शिकवतं ते शिक्षण अशा शिक्षणाच्या अनेक व्याख्या आहेत.
आता प्रश्न निर्माण होतो शिक्षण का घ्यायचे ?
तर ज्ञान मिळविण्यासाठी व मिळालेल्या ज्ञानातून नोकरी व रोजगार मिळावा यासाठी.आजच्या या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून सगळ्यांनाच नोकरी किंवा रोजगार मिळतो का? उत्तर नाही असेच….
मग अशा शिक्षणातून पदव्यांचे कागद घेऊन फिरणा-या तरुणांचे करायचे काय ?
त्यांच्या हाताला काम देता येत नसेल तर ते शिक्षण जगायला खरंच उपयोगी पडतं का?
याचा विचार करावा लागेल. शिक्षणात नव्याने काही करण्याची त्याची रचना आणि मांडणी बदलण्याची.कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा सूक्ष्मपणे विचार करण्याची.
आपल्याकडे दहावीपर्यतचे शिक्षण हे पाठ्यपुस्तकावर आधारित आहे.
दहावीनंतर आयटीआय किंवा डिप्लोमा कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण दिले जाते.
प्राथमिक स्तरापासून मुलांच्या भावविश्वाशी निगडित असलेले कला ,कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यांचे शिक्षण दिले जाते.यातून मुलांची कौशल्ये विकसित होतात.परंतु या विषयांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही.
या विषयांचा बराच वेळ मुख्य विषयांना देऊन यांना कमी महत्त्व दिले जाते.त्यामुळे या विषयांमध्ये कौशल्ये प्राप्त करणारी मुले खूप थोडी आढळतात.
अभियांत्रिकी व वैद्यकिय क्षेञात जाण्यासाठी महत्त्वाचे वाटणारे विषय यांना जास्त प्राधान्य दिले जाते.
त्यामुळे ज्या विषयातून कौशल्य विकसित होतात त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
दुसरी गोष्ट अशी की किती पालकांना वाटते माझा मुलगा चांगला खेळाडू व्हावा.उत्कृष्ट गायक व्हावा ,चांगला संगीतकार व्हावा,उत्तम चित्रकार व्हावा ,चांगला व्यापारी व्हावा,चांगला प्लंबर व्हावा ,चांगला इलेक्ट्रिशियन व्हावा.चांगला मार्केटिंग तज्ञ व्हावा.आपण डॉक्टर ,इंजिनियर या पलीकडे विचार करत नाही.
माझे स्वप्न
‘मला चांगला शेतकरी बनायचे आहे.’असे छातीठोक पणे सांगणारा एखाद्या मुलगा अभावानेच आढळतो.
कारण शेतीला दिलेले दुय्यम स्थान आणि अनिश्चित असणारी शेती. कृषीप्रधान देश म्हणून ओळख असणाऱ्या भारतासाठी ही गोष्ट न रुचणारी आहे.
जगण्यासाठी उपयोगी पडते तेच खरं शिक्षण.हे शिक्षण आपण देतोय का ? यावर चिंतन झाले पाहिजे.
कौशल्य शिक्षण
शिक्षणातून ज्ञान तर मिळालंच पाहिजे.त्याचबरोबर पोट भरण्याचे कौशल्यही प्राप्त झालं पाहिजे. हा अभाव आपल्या शिक्षणात जाणवतो.
त्यासाठी प्राथमिक स्तरापासून कौशल्य शिक्षणाला जास्त महत्त्व दिले पाहिजे.
मुलांची आवड आणि कल पाहून त्यांना शिकण्याची संधी असावी.सगळे विषय शिकताना अवघड विषयाची भीती आणि न्यूनगंड मनात तयार होतो.
आवड व रुची असणाऱ्या विषयात मुले कमालीची प्रगती करतात.त्यातील कौशल्य आत्मसात करतात.त्या कौशल्यातून मुलांचाआत्मविश्वास वाढतो.मिळवलेल्या कौशल्याच्या जोरावर त्या क्षेत्रात प्रभुत्व मिळवतात.
भविष्यात त्याच विषयात मास्टर बनून आपलं करिअर बनवू शकतात.आपल्या परिसरात अनेक प्लंबर ,इलेक्ट्रिशियन,पेंटर,टेलर असे अनेक कारागीर दिसून येतात की त्यांचे शिक्षण काही कारणाने अर्ध्यातच थांबले.
परंतु अंगी असलेल्या कौशल्यावर त्यांनी आपला रोजगार शोधला.
करियरच्या वाटा
दहावी बारावी नंतर करिअरचा प्रश्न असतो.
शिक्षण पूर्ण झाले की लगेच नोकरी मिळेल अशा शिक्षणाचा पर्याय निवडला जातो. अशा वेळी मुलांच्या आवडीकडे दुर्लक्ष केले जाते.
शिक्षणातील कोणती शाखा निवडावी याचा निर्णय पालक घेतात.तो पालकांनी निश्चित घ्यावा.परंतु आपल्या पाल्याला विचारात घेऊन त्याच्याशी बोलून घ्यावा. ब-याच वेळा पालकांनी लादलेला निर्णय मुलांना आवडत नसला तरी मान्य करावा लागतो.
त्यामुळे अर्ध्यातच शिक्षण सोडणे,अपेक्षित प्रगती न होणे ,नैराश्य येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.
शिकलेल्या सर्वांनाच चांगल्या नोकऱ्या मिळतील याचीही आज शाश्वती नाही.
वाढती लोकसंख्या ,शिक्षण घेणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण आणि प्रत्यक्षात उपलब्ध रोजगार व नोकरीच्या संधी यात फरक आहे.
त्यामुळे ज्याच्याकडे अवगत केलेले विशेष कौशल्य अथवा गुणवत्ता असेल त्यांनाच भविष्यात मोठ्या संधी आहेत.इतरांना बेरोजगारांच्या यादीत सामील व्हावे लागेल.
जीवन जगण्यासाठी कौशल्य शिक्षण. हा नवा विचार काळाशी सुसंगत असा ठरणारा आहे.यासाठी शैक्षणिक धोरणात खूप मोठे बदल करून कौशल्य शिक्षणाला खूप महत्त्व असायला हवे.
आतापर्यंत अनेक आयोगांनी तसेच अभ्यासगटांनी शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रमाविषयी अभ्यासपूर्ण अहवाल दिले. महत्वपूर्ण शिफारशी केल्या.परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नसल्याने फारसा बदल दिसून येत नाही.
जगण्यासाठी शिक्षण

२००९ च्या शिक्षणहक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत झाले असले तरी त्याला कौशल्याची आणखी जोड असावी.
मुलांमधील सृजनशीलता ,कल्पकता,नावीन्यता, संशोधकवृत्ती विकसित होण्यासाठी मुलांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रमाची योजना असायला हवा.यातून विविध कौशल्ये प्राप्त व्हावीत.
एखाद्याला चांगले गुण मिळून अभियांत्रिकीला प्रवेश मिळेल. शिक्षणही होईल.परंतु नोकरी मिळेलच हे सांगता येत नाही.
ज्याच्याकडे इतरांपेक्षा वेगळे स्कील असेल त्यालाच संधी मिळू शकते.नाही मिळाली तर स्वतः चा रोजगार निर्माण करता आला पाहिजे.
फक्त पाठ्यपुस्तकात कौशल्ये असून चालणार नाही तर शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या अंगी ती असायला पाहिजेत.
तरच ती जगण्यास उपयुक्त ठरतील.
©️✒लक्ष्मण जगताप,बारामती
Very
Very good