3 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- मंगळवार ,
दिनांक- 03/01/2023,
मिती- पौष शुद्ध 12
शके-1944,
सुविचार- ज्ञान तेथे मान.
आजचा दिनविशेष-
3 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 3रा किंवा लीप वर्षात 3रा दिवस असतो.
महिला मुक्ती दिन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन
ठळक घटना आणि घडामोडी-
पंधरावे शतक-
१४३१ – जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली.
१४९६ – लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.
सोळावे शतक-
१५२१ – पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
अठरावे शतक-
१७७७ – प्रिंसटनची लढाई – जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला.
एकोणिसावे शतक-
१८१५ – ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरुद्ध संयुक्त फळी उभारली.
१८२३ – स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली.
१८३३ – ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले.
१८३४ – स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले.
१८५५ – हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
१८६८ – जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.
विसावे शतक-
१९२१ – तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
१९२५ – बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
१९३१ – महात्मा गांधीनी गोलमेज परिषदेत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली .
१९४७ – अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यात आले.
१९५० – पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
१९५२ – स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
१९५७ – हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणारे पहिले मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
१९५८ – सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
१९५९ – अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले.
१९६१ – अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
१९६२ – पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
१९९० – पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
१९९४ – रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.
एकविसावे शतक-
२००४ – ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
जन्म-
१०६ – सिसेरो, रोमन राजकारणी.
११९६ – त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
१८३१ – सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
१८८३ – क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.
१८८६ – जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८९२ – जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
१९१७ – कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
१९२१ – चेतन आनंद, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
१९२२ – कीरत चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
१९३१ – यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक.
१९६९ – मायकेल शुमाकर, फॉर्म्युला १ चालक.
१९७१ – आमेर नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
७२२ – गेमेई, जपानी सम्राज्ञी.
१३२२ – फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.
१४३७ – व्हाल्वाची कॅथेरीन, इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याची पत्नी.
१५४३ – हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगालचा शोधक.
१९६७ – जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.
१९७५ – ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.
१९८२ – अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
१९९४ – अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
१९९८ – केशव विष्णू बेलसरे,तथा “बाबा” बेलसरे , मराठी तत्त्वज्ञानी,श्रीब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
२००० – डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर.
२००१ – सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
२००२ – फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
२००२ – सतीश धवन, भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ.
२००५ – जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
२०१३ – एम. एस. गोपालकृष्णन, भारतीय व्हायोलिन वादक.
२०१५ – सरिता पदकी, मराठी लेखिका.
प्रतिवार्षिक पालन-
ऑक्युपेशन थेरपी दिन
बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन)
महिला मुक्तिदिन
मूलभूत कर्तव्यपालन दिन
वर्धापनदिन : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अॅपल.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी
बालगीत-
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला चला मुलांनो चला संगती !
फर चा कोट चढवू अंगावरती,
गम बूट घालू, काठी धरू पुढती !
पांढरा शुभ्र याक, खूप खूप केसाळ,
अंगावर त्याच्या बर्फ आहे फेसाळ !
लाल लाल सफरचंद टप टप पडती,
पहाडी माणसाच्या गालावर खुलती !
बटाट्यांचा येथे आहे बर सुकाळ,
बर्फाच्या अंगणात नाचतात सर्वकाळ!
चिकू सारखे दिसते ते ‘किवी’ फळ,
आंबट – गोड गर खाऊन काढूया पळ !
देवदार – चिनार ची हिरवी-हिरवी शाल,
बर्फमय बुट्ट्याची किमया विशाल !
हिमनदी आहे जणू दुध- गंगा,
डोळे भरून पाहूया करू नका दंगा !
सोनेरी किरणे शिखरावरती,
हिम-मोती झेलुया अंगावरती !
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला मुलांनो चला संगती !
माहिती संकलन: प्राची तुंगार
सामान्यज्ञान
व्यक्तीविशेष-
सावित्रीबाई फुले
३ जानेवारी हा सावित्रीबाईंची जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले.
१८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शिक्षण-
लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरीच शिक्षण दिले. ज्योतिरावांकडे त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांच्याकडे होती. त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतले.
पहिली अहमदनगर मधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवलेल्या संस्थेत होती. दुसरा अभ्यासक्रम पुण्यातील एका सामान्य शाळेत होता. त्यांचे प्रशिक्षण पाहता, सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या असतील.
सावित्रीबाईंची जन्मतारीख, म्हणजे ३ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुलींच्या शाळांमध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
चरित्र-
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना “फुले” हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.
सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
पहिली शाळा
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.
(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे.
(मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७ मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९ मध्ये मुले आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले.मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
रूढी व परंपरा-
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
पुस्तके –
सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
मृत्यू-
सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी १८९७ मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले. क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला.
गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला.