6.अर्थनियोजन | 9वी ,गणित

6.अर्थनियोजन

9वी ,गणित

बचत म्हणजे काय ?

प्रत्येक व्यक्तीला विविध गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळेच वर्तमानातील आवश्यक गरजा
पूर्ण करून इतर गरजा भागवण्यासाठी प्रत्येकजण पैसे साठवण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आपण ‘बचत’ करणे असे
म्हणतो.

ही बचत सुरक्षित राहून तिच्यात वाढ होण्यासाठी ती आपण ‘ठेव’ म्हणून ठेवतो किंवा जमीन, घर यांसारख्या
स्थावर बाबी खरेदी करतो. यालाच ‘गुंतवणूक करणे’ असे म्हणतात.

प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो, तसेच बचत
केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो याला ‘अर्थनियोजन’ म्हणतात. संपत्तीची वृद्धी आणि सुरक्षितता
हे अर्थनियोजनाचे मुख्य प्रयोजन असते.

प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या अपेक्षित व अनपेक्षित घटनांकरिता तरतूद म्हणून अर्थनियोजनाचा उपयोग होतो.

काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अपेक्षित घटना
(1) मुलांचे शिक्षण व त्यांच्यासाठी इतर खर्च
(2) व्यवसायासाठी भांडवल
(3) वाहन खरेदी
(4) घराचे बांधकाम किंवा खरेदी
(5) वृद्धापकाळातील गरज
अनपेक्षित घटना
(1) नैसर्गिक आपत्ती
(2) कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आजारपण
(3) अपघातामुळे झालेले नुकसान
(4) आकस्मिक मृत्यू

बचत-
(1) बचत सुरक्षित राहणे व तिच्यात वाढ होणे हिताचे असते. आपली बचत केलेली रक्कम बँकेत किंवा पोस्टात
सुरक्षित राहते. बँकेतील बचत खात्यात जमा झालेल्या रकमेमुळे रोकडरहित (cashless) व्यवहार करणे सोईचे होते. अशा
व्यवहारांमुळे स्वत:जवळ अधिक रक्कम ठेवावी लागत नाही व ती रक्कम हरवण्याची वा चोरीला जाण्याची भीती राहात नाही.

(2) आपण केलेली बचत रोख स्वरूपात असेल आणि तिची गुंतवणूक न करता ती तशीच ठेवली तर तिचे मूल्य
काळाबरोबर कमी होते. म्हणजेच वस्तूविकत घेण्याची त्या रकमेची शक्ती म्हणजे पैशाची क्रयशक्ती (Purchasing
power) कमी होते. (उदा. आज 10 रुपयांमध्ये 2 पेन्सिली मिळत असतील, तर काही वर्षांनंतर त्याच किमतीत एकच
पेन्सिल मिळेल.) यासाठी बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यात वाढ होणे आवश्यक आहे.

(3) बचत केलेली रक्कम व्यवसाय वृद्धी, नवे उद्योग चालू करणे, अशा कामांसाठी वापरली गेली तर राष्ट्रीय
उत्पादनात वाढ होते.

(4) एकूण मिळकतीपैकी बचतीचा काही भाग समाजकार्यासाठी खर्च केल्यास त्याचा दूरगामी फायदा सर्वांनाच
होतो.

(5) आवश्यक तेवढा खर्च करून झाल्यावर चैनीच्या गोष्टींवरील खर्च कमी करून शिक्षण, वैद्यकीय उपचार,
इत्यादींसाठी बचत करणे हिताचे असते.

गुंतवणूक-
गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत.गुंतवणूकदार बँक, पोस्ट अशा आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांमध्ये गुंतवणूक
करणे पसंत करतात कारण तेथे पैशांची सुरक्षितता जास्त असते. शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक
करण्यात थोडी जोखीम असते. कारण ज्या उद्योगात हे पैसे गुंतवले जातात त्या उद्योगास तोटा झाल्यास, गुंतवलेली
रक्कम कमी होते. याउलट फायदा झाल्यास रक्कम सुरक्षित राहते आणि लाभांश मिळू शकतो.
गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना दोन मुख्य बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे जोखीम व दुसरी
म्हणजे लाभ. अधिक जोखीम पत्करून गुंतवणूकदार अधिक लाभ मिळवू शकतो, परंतु अधिक जोखीम असल्यामुळे
तोटाही होऊ शकतो हे ध्यानात ठेवले पाहिजे.

कर आकारणी –
राष्ट्राच्या उभारणीसाठी शासन विविध योजना आखत असते. या योजनांच्या कार्यवाहीसाठी शासनाला फार
मोठ्या रकमेची गरज असते. अनेक प्रकारच्या करांची आकारणी करून ही रक्कम उभी केली जाते.

करांची उपयुक्तता (Utility of taxes)
1. पायाभूत सुविधा पुरवणे.
2. विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे.
3. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकास कामेआणि संशोधन यांबाबत योजना राबवणे.
4. कायदा आणि सुव्यवस्था राखणे.
5. नैसर्गिक आपत्तीमुळेबाधित झालेल्या लोकांना मदत करणे.
6. राष्ट्राचेआणि नागरिकांचेसंरक्षण करणे, इत्यादी

प्रत्यक्ष कर (Direct taxes)
ज्या करांचा भार प्रत्यक्ष कर दात्यावर पडतो,ते कर म्हणजे प्रत्यक्ष कर.
उदा.आयकर, संपत्तीकर, व्यवसाय कर इत्यादी.

अप्रत्यक्ष कर (Indirect taxes)
ज्या करांचा भार प्रत्यक्षपणे कर दात्यावर पडत नाही,ते कर म्हणजेअप्रत्यक्ष कर.
उदा. केंद्रीय विक्री कर, मूल्यवर्धित कर,अबकारी कर, कस्टम ड्युटी, सेवाकर, इत्यादी.
व्यक्तीचे, संस्थेचे किंवा इतर कायदेशीर उद्योगांचे भारतातील उत्पन्न, आयकर अधिनियमान्वये ठरलेल्या
मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यावर आयकर (प्राप्तीकर) आकारला जातो.
या प्रकरणात आपण प्रत्यक्ष करापैकी फक्त व्यक्तींना भराव्या लागणाऱ्या आयकराचा विचार करणार आहोत.

आयकर –
आयकराची आकारणी केंद्र सरकार करते. भारतामध्ये आयकर आकारणी दोन अधिनियमांद्वारे केली जाते.
(1) आयकर कायदा 1961 हा दि. 01.04.1962 पासून अस्तित्वात आला.
(2) प्रत्येक वर्षी संसदेत संमत केला जाणारा अर्थविषयक तरतुदी असणारा कायदा.
दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी तरतुदी असणारे अर्थसंकल्प
(Budget) सादर करतात. त्यात आयकराचे दर सुचवलेले असतात. संसदेने अर्थसंकल्प मंजूर केला की हे दर पुढील
वर्षासाठी लागू होतात.
आयकराचे दर प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात निश्चित केले जातात.

आयकराच्या संदर्भातील बाबी :
1. करदाता (An assessee) : आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमांनुसार ज्या व्यक्तीने
आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला ‘करदाता’ म्हणतात.
2. वित्तीय वर्ष(Financial year) : ज्या एक वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला
‘वित्तीय वर्ष’ असे म्हणतात. आपल्या देशात सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष असते.
3. कर आकारणी वर्ष(Assessment year) : वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वित्तीय वर्षास ‘कर
आकारणी वर्ष’ असे म्हणतात.

कायम खाते क्रमांक (PAN) :-

प्रत्येक व्यक्तीने अर्ज केल्यावर आयकर विभागाकडून एक विशिष्ट असा
दहा अंकाक्षरात्मक क्रमांक दिला जातो. त्यास ‘कायम खाते क्रमांक’ म्हणजे ‘Permanent Account Number
(PAN)’ म्हणतात. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांत आणि आर्थिक व्यवहारांत हा क्रमांक नमूद करणे आवश्यक
असते.

पॅनकार्डाचा उपयोग : आयकर विभागाकडे करभरणा
करण्यासाठीचे चलन, करविवरणपत्र (रिटर्नचा फॉर्म) इतर पत्रव्यवहार
यांवर पॅन क्रमांक लिहिणे बंधनकारक असते. तसेच मोठे आर्थिक
व्यवहार करताना पॅन नोंदवावा लागतो. अनेक वेळा पॅनकार्डाचा
उपयोग ओळखीचा पुरावा (Identity proof) म्हणूनही होतो.

आयकर आकारणी-
आयकराची आकारणी उत्पन्नावर होत असल्यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत जाणणे आवश्यक आहे.
उत्पन्नाचे मुख्यतः पाच स्रोत आहेत :
(1) पगाराद्वारे मिळणारे उत्पन्न.

(2) घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न.

(3) धंदा आणि व्यवसायातून मिळणारे उत्पन्न.

(4) भांडवली नफ्यातून (Capital gain) मिळणारे उत्पन्न.

(5) इतर स्रोतांतून मिळणारे उत्पन्न.

आयकराचे गणन करण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्न विचारात घेतले जाते. आयकर अधिनियमांच्या 80C,
80D, 80G इत्यादी कलमांना अनुसरून एकूण वार्षिक उत्पन्नातून काही वजावट मिळते. ही वजावट करून उरलेल्या
उत्पन्नाला करपात्र उत्पन्न म्हणतात. आयकराची आकारणी या उत्पन्नावरच केली जाते.
कर आकारणीचे नियम काही वेळा बदलले जातात, म्हणून प्रत्यक्ष कर आकारणी करताना अद्ययावत नियम
माहीत असणे आवश्यक असते.
करपात्र उत्पन्नापैकी ठरावीक मर्यादेपर्यंतच्या रकमेवर कर आकारला जात नाही. या रकमेस करपात्र उत्पन्नातील
मूळ सवलत रक्कम असे म्हणतात.

1.शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पन्नावर आयकरातून सूट असते.
2.आयकर कलम 80 G अन्वये पंतप्रधान मदतनिधी, मुख्यमंत्री मदतनिधी किंवा मान्यताप्राप्त संस्थांना
देणग्या दिल्यास आयकरात 100% सूट मिळते.
3. 80 D या कलमान्वये आरोग्यासाठीच्या विमा हप्त्यावर सूट दिली जाते.
4.सामान्यत: एकूण गुंतवणुकींवर 80C या कलमान्वये विविध प्रकारच्या गुंतवणुकींपैकी जास्तीत जास्त
1,50,000 रुपयांपर्यंत वजावट मिळते.

भारत सरकारच्या http://www.incometaxindia.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
त्या साइटवरील income tax calculator या मेन्यू वर क्लिक करा. येणाऱ्या फॉर्ममध्ये काल्पनिक
उत्पन्न आणि वजावटीच्या काल्पनिक रकमा लिहून आयकराची रक्कम काढण्याचा प्रयत्न
करा.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.