26 डिसेंबर दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- सोमवार, दिनांक- 26/12/2022,
मिती- पौष शुद्ध चतुर्थी , शके-1944
सुविचार- जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.
आजचा दिनविशेष-
26 डिसेंबर- बाबा आमटेंचा जन्म
ठळक घटना आणि घडामोडी
१८९८ – मेरी क्यूरी आणि पिएर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१९७६ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)ची स्थापना.
१९८२ – टाइम मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९९७ – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार देण्यात आला.
एकविसावे शतक-
२००४ – हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
जन्म-
१८९९ – उधम सिंग, भारतीय क्रांतिकारी
१९१४ -.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
१९१४ – डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या.
१९१७ – प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.
१९२५ – पं. कृष्णा गुंडोपंत तथा के.जी. गिंडे, भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
१९३४ – द.दि. पुंडे, मराठी समीक्षक.
१९३५ – डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी).
१९४१ – लालन सारंग, मराठी अभिनेत्री.
१९४८ – डॉ. प्रकाश आमटे, मराठी समाजसेवक
मृत्यू-
१९७२ – हॅरी ट्रुमन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष.
१९८९ – केशवा तथा के. शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण (१९७६), ’चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट’ आणि ’शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ यांचे संस्थापक
१९९९ – शंकर दयाळ शर्मा, भारताचे राष्ट्रपती.भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
२००० – प्रा. शंकर गोविंद साठे, मराठी साहित्यिक.
२००६ – कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर, मराठी अभिनेते
२०११ – सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन-
ग्राहक दिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
प्रार्थना-
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी
बालगीत –
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…
प्रश्नमंजुषा-
व्यक्तीविशेष-
समाजसेवक बाबा आमटे
मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले.
त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली.
इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली.
पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्षनागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.
इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली.इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला.
कार्य-
कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.
‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या बा. भ. बोरकरांच्या ओळीचा ‘देखणा प्रत्यय’ या प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवाऱ्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.
भामरागडतालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व स्नुषा डॉ. मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेतच.
हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधना आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्या ’समिधा’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधा’तून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते.
लेखन-
सतत कामात असूनही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति व निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले.
गांधींजींनी त्यांना अभय साधक अशी पदवी दिली होती. गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते. संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होता.
बाबा आमटे यांनी खालील पुस्तके-
‘ज्वाला आणि फुले’ – कवितासंग्रह
‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)
‘माती जागवील त्याला मत’
बाबा आमटे यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे
मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर)
बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
आंतरराष्ट्रीय पुरस्कार :
सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९९९
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – इ.स. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्.
संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार, इ.स. १९९८
आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका इ.स. १९८९
टेंपल्टन बहुमान, अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी), इ.स. १९९०
पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर, इ.स. १९९१
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार, इ.स. १९९१
पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)
भारतीय पुरस्कार :
पद्मश्री इ.स. १९७१
पद्मविभूषण इ.स. १९८६
अपंग कल्याण पुरस्कार इ.स. १९८६
सरकारचा सावित्रीबाई फुलॆ पुरस्कार इ.स. १९९८
गांधी शांतता पुरस्कार इ.स. १९९९
महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) १ मे, इ.स. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.
मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार इ.स. १९८५
पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार इ.स. १९८६
महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इ.स. १९७४
राष्ट्रीय भूषण पुरस्कार इ.स. १९७८
जमनालाल बजाज पुरस्कार इ.स. १९७९
एन डी दिवाण पुरस्कार इ.स. १९८०
राजा राम मोहनराय पुरस्कार इ.स. १९८७
भरतवास पुरस्कार इ.स. २००८
जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९८८
महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स. १९९१
कुमार गंधर्व पुरस्कार इ.स. १९९८
जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक इ.स. १९९८
डी.लिट – नागपूर विद्यापीठ इ.स. १९८०
डी. लिट. – पुणे विद्यापीठ, इ.स. १९८५-८६
देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) इ.स. १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल