पसायदान | आतां विश्वात्मकें देवें | Pasaydan, संत ज्ञानेश्वर

पसायदान 

आतां विश्वात्मकें देवें

संपूर्ण शालेय परिपाठ, Paripath

पसायदान - आतां विश्वात्मकें देवें
पसायदान –
आतां विश्वात्मकें देवें

संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या-(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळ्या) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरीरूपी वाग् यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात …

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत !

पसायदान-

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

पसायदान मराठी अर्थ-

आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्या मध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत. ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥
हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥

जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

Author: Active Guruji

Blogger

24 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.